महाराष्ट्र

महिला महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

भारतीय संघर्ष,

गेवराई, दि. २ (प्रतिनिधी) सत्य, अहिंसा, स्वच्छता, सामाजिक समता आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची आजच्या युवा पिढीला नितांत गरज आहे. विद्यार्थिनींनी त्यांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणावेत, असे प्रतिपादन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांनी केले.

येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप दिले. त्यांच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून देशाच्या संरक्षणासोबतच शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. कैलास सावंत व प्रा.‌डाॅ. दत्ता तंगलवाड यांनी ही आपल्या विचारातून महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व सामाजिक समतेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेच्या कार्याचे स्मरण केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी दिवाण यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. संगिता आहेर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button