महाराष्ट्र
पुणे : (प्रतिनिधी) :- कोरेगाव पार्क, लष्कर परिसर, कल्याणीनगर, कर्वेनगर, बाणेर, सूस आणि घोरपडीतील वाढत्या वाहतूक कोंडीतून सुटकेचा ‘उड्डाणमार्ग’; महत्त्वाचे पूल पूर्णत्वाकडे, नव्या वर्षात वाहतुकीला दिलासा
भारतीय संघर्ष न्यूज

पुणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या पुणेकरांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने विविध भागांत हाती घेतलेल्या उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि कनेक्टिव्हिटी रॅम्पच्या कामांपैकी चार ते पाच महत्त्वाची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. डिसेंबरअखेर ही कामे पूर्ण करून नवीन वर्षात संबंधित पूल वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
कोरेगाव पार्क, लष्कर परिसर, कल्याणीनगर, कर्वेनगर, बाणेर, सूस आणि घोरपडीसह शहराच्या विविध भागांत सध्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. बांधकामामुळे काही रस्ते बंद ठेवावे लागले असून अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या अतिरिक्त अंतर आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
साधू वासवानी पूल अंतिम टप्प्यात…
लष्कर परिसराला कोरेगाव पार्क, येरवडा आणि नगर रस्त्याशी जोडणारा जुना साधू वासवानी पूल जीर्ण झाल्याने त्याच्या जागी नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे.
मे 2023 मध्ये या कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला कामाला विलंब झाला. जून 2024 नंतर कामाला गती देण्यात आली असून सध्या रेल्वेमार्गावरील ओपन वेब गर्डर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून जानेवारीत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
पाषाण-सूस वाहतुकीसाठी नवीन कनेक्टिव्हिटी रॅम्प
पाषाण-सूस उड्डाणपुलाला बंगळूर महामार्गावरील (NH-48) सेवा रस्त्याशी जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी लिंक रॅम्प उभारण्यात येत आहे.
हा रॅम्प सुरू झाल्यानंतर पाषाण-सूस रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने तसेच चांदणी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्गावर प्रवेश करणे अधिक सोपे होणार आहे. नवीन वर्षात हा रॅम्प वाहतुकीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
कर्वेनगर-सनसिटी पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा,
सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुठा नदीवरील कर्वेनगर-सनसिटी पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
कर्वेनगर बाजूच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण झाले असून सनसिटी बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करून जानेवारीमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर सिंहगड रस्ता आणि कर्वेनगरदरम्यान नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
घोरपडी उड्डाणपुलाचे 90 टक्के काम पूर्ण
घोरपडी येथील मिरज रेल्वेमार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
सध्या डांबरीकरण, रंगरंगोटी, सेवावाहिन्यांचे स्थलांतर आणि वाहतूक चिन्हे बसविण्याची कामे सुरू आहेत.
हा पूल सुरू झाल्यानंतर घोरपडी रेल्वे गेटमुळे होणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लष्कर परिसर, घोरपडी, मुंढवा, कोरेगाव पार्क, खराडी आणि पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीलाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
नवीन वर्षात वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
पुणे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांच्या म्हणण्यानुसार, शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि रॅम्पच्या चार ते पाच कामांना डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ही कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षात संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. आणखी एका पुलाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.




