महाराष्ट्र
रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी धरणातून तात्काळ पाणी सोडा! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
भारतीय संघर्ष........

गेवराई! विष्णु राठोड
रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जायकवाडी धरणातून तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा उपयुवा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी बीड व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मराठवाड्यातील शेतकरी आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत आहेत. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज असताना धरणातून पाणी सोडण्यास विलंब झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





