गेवराई, दि. ८ (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवात चार पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले. लोक/आदिवासी नृत्य द्वितीय पारितोषिक, वक्तृत्व तृतीय, स्टॉल इन्स्टॉलेशन तृतीय पारितोषिक आणि एकांकिका नाट्यसंहिता तृतीय पारितोषिक प्राप्त करून अट्टल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलावंतांनी यश मिळवले.
याच संघाने बीड जिल्हा युवा महोत्सवात आठ पारितोषिके पटकावली होती. ज्यामध्ये वक्तृत्व प्रथम, स्टॉल इन्स्टॉलेशन प्रथम, प्रहसन प्रथम, मुकाभिनय तृतीय, एकांकिका तृतीय, स्त्री अभिनय तृतीय, एकांकिका दिग्दर्शन तृतीय आणि संहिता लेखन प्रथम अशी पारितोषिके अट्टल महाविद्यालयाच्या संघाने सिरसाळा येथे झालेल्या बीड जिल्हा युवा महोत्सव मिळवली होती. यापैकी सहा कलाप्रकार केंद्रीय युवा महोत्सवासाठी निवडले जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या केंद्रीय युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी अट्टल महाविद्यालयाच्या लौकिकात भर टाकली आहे. जिल्हास्तरावर आणि केंद्रीय स्तरावर एकुण बारा पारितोषिके महाविद्यालयाच्या संघाने पटकावली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पांगरीकर, डॉ. समाधान इंगळे, डॉ. संजीवनी डावकर, प्रा. शरद सदाफुले यांनी संघ प्रमुख म्हणून काम पाहिले. दीपक गिरी यांनी नृत्य दिग्दर्शन केले, तर अमोल कांबळे आणि रोहित सातपुते यांनी साथसंगत केली.
यावेळी उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, प्रबंधक भास्कर सुरवसे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी रूपनर, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या.
Back to top button
