बीड,! विष्णु राठोड,
ता.१९ :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये पक्षाच्या व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
एका दुर्गम तांड्यावरून येऊन, सामान्य कुटुंबातील या तरुण तडफदार कार्यकर्त्याने आपल्या कामाच्या जोरावर पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्राताई पवार यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्यास, पक्षाची मुळे तळागाळापर्यंत घट्ट होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यात बंजारा समाजाचे मोठे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकांचे जातीय समीकरण पाहता, रविकांत राठोड यांना संधी दिल्यास बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी राहू शकते. पक्षातील संभाव्य आठ नावांच्या यादीत रविकांत राठोड यांचे नाव आघाडीवर असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची क्रेझ वाढली आहे.आता पक्ष नेतृत्व राठोड यांना संधी देऊन बंजारा समाजाला न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Back to top button
