महाराष्ट्र

चकलांबा ग्रामपंचायत दुजाभाव करत असल्याचा भाविकांचा आरोप तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज दर गुरुवारी अमीर बाबा दर्गा येथे एक टँकर टाकण्याची भाविकांची मागणी

भारतीय संघर्ष......

 

चकलांबा (प्रतिनिधी) : एकीकडे चकलांबा ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे गावातील पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत अमीर बाबा दर्ग्यात मात्र गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून तसेच ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज देऊनही पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याचे दर्गा सेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 ” दर्ग्यातील विहिरीने गाठला तळ

चकलांबा येथील हजरत अमीर बाबा दर्गा हे हिंदू-मुस्लिम समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर गुरुवारी आणि अमावस्येला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दर्गा परिसरातील विहिरीने तळ गाठल्याने पिण्यासाठी तसेच वजू करण्यासाठी पाण्याची अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रभरातून व परिसरात भाविक वास्तव्यास असल्याने त्यांना पिण्याचे पाणी विकत घेणे परवडत नसल्याची परिस्थिती आहे. अशा वेळी ग्रामपंचायतीने दर्ग्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

अर्ज दिला, स्वीकारल्याचा शिक्काही; तरी टँकर नाही!

दर्गा सेवक नारायण कदम यांनी समस्त भाविकांच्या वतीने दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्यासाठी रीतसर अर्ज दिला. ग्रामपंचायतीने दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी अर्ज स्वीकारल्याचा शिक्का मारला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अर्ज देऊनही दर्ग्यात पाण्याचा टँकर पोहोचला नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधूनही पाणीपुरवठ्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप दर्गा सेवकांनी केला आहे. अर्जावर स्वीकारल्याचा शिक्का पडला; मात्र प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल आता भाविक उपस्थित करत आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाला भाविकांचे थेट सवाल!

गावातील इतर भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असेल, तर धार्मिक स्थळ असलेल्या अमीर बाबा दर्ग्यासाठी पाण्याची व्यवस्था का केली जात नाही? दर्ग्यात येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाला का दिसत नाही? पाणीपुरवठ्याबाबत दुजाभाव केला जात आहे का? असे सवाल भाविकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मात्र, या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

” आठवड्याला किमान एक टँकर देण्याची मागणी “

हजरत अमीर बाबा दर्ग्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी गेवराईचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दर्ग्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आठवड्याला किमान एक टँकर पाणी उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा समस्त भाविकांनी व्यक्त केली आहे.

आता चकलांबा ग्रामपंचायत प्रशासन या मागणीची दखल घेऊन दर्ग्यातील पाणीप्रश्न सोडवणार का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button