महाराष्ट्र

शारदा प्रतिष्ठानचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तारेख शफिक शेख यांना जाहीर!

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क.....

 

गेवराई | विष्णु राठोड
शारदा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ यंदा शिव शारदा पब्लिक स्कूलचे उपक्रमशील शिक्षक तथा शैक्षणिक विभाग प्रमुख तारेख शफिक शेख यांना जाहीर झाला आहे. गेवराई तालुक्यातील दहा शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी नुकतीच पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा तटस्थ निवड समितीमार्फत आढावा घेऊन पुरस्कारार्थींची निवड करण्याची प्रतिष्ठानची परंपरा आहे. यंदा या पुरस्काराचे १९ वे वर्ष आहे.

पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, गोदावरी सभागृह, र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते तसेच आमदार विजयसिंह पंडित व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक गौरविण्यात येणार आहे.

तारेख शफिक शेख हे विज्ञान व इंग्रजी विषयाचे अभ्यासू शिक्षक असून, शिव शारदा पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच शाळेच्या क्रीडा महोत्सव व इतर उपक्रमांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संस्थेचे मार्गदर्शक रणवीर पंडित काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे.

शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मार्गदर्शन करण्यासोबतच ते सहकारी शिक्षकांनाही वेळोवेळी शैक्षणिक मार्गदर्शन करतात. सर्व सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी त्यांचे सातत्यपूर्ण योगदान राहिले आहे.

तारेख शफिक शेख यांची शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याने शिव शारदा पब्लिक स्कूलच्या शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button