महाराष्ट्र

बीड जिल्हा थोर साधूसंतांची पावन भूमी – दत्तात्रय महाराज गिरी

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

गेवराई : विष्णु राठोड
बीड जिल्ह्याला ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि सामाजिक चळवळींचा मोठा वारसा लाभलेला असून, या भूमीत अनेक थोर महापुरुष, संत महात्म्यांचा जन्म झालेला असून हा जिल्हा थोर क्रांतीकारांचा जिल्हा आहे. हे आपले सर्वांचे भाग्य आहे असे प्रतिपादन महंत प्रेममुर्ती दत्तात्रय महाराज गिरी (श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव) यांनी केले.


गेवराई तालुक्यातील कवडगाव येथे स्वानंद सुख निवासी संत कुलभूषण महात्मा श्री संत नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत ह.भ.प.शिवाजी महाराज, ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व ५० व्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पंचक्रोशीतील महिला, पुरुष तसेच युवक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना दत्तात्रय महाराज म्हणाले संत नगद नारायण महाराज, संत भगवानबाबा, संत वामनभाऊ , संत बंकटस्वामी, संत माऊली महाराज, संत महादेव महाराज, शिवाजी महाराज या थोर साधू संतांनी समाज जागृतीचे महान कार्य करुन समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम केले आहे. अशा संत महंतांच्या विचाराची आजही खरी गरज आहे. तसेच संत-महंतांच्या विचारांच्या भक्तीचा वारसा प्रत्येकाने आपल्या मनी बाळगून त्याच्या विचाराची चालना मनात रुजवली पाहिजे असेही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान काल्याचे कीर्तनानंतर भाविकांना माणिकराव निवृत्ती मोहिते व शिवनाथ वामनराव ढाकणे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुवर्ण महोत्सवी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी तरुण युवक मंडळ, समस्त गांवकरी मंडळ, कवडगांव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button