भारतीय संघर्ष,
पुणे/ भारतीय संघर्ष वृत्तसेवा
पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस चौकीत 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवून, बेल्टने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या कडक आदेशानंतर आणि फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टच्या आधारे गुरूवारी ही थेट कारवाई करण्यात आली.
ही धक्कादायक घटना 20 आणि 21 जुलै 2026 दरम्यान घडली. कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून (एका हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी) या मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना बाल न्याय समितीसमोर हजर न करता, अनेक दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आले. त्यांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली आणि गाडीच्या बोनेटवर बांधून त्यांची सार्वजनिक ठिकाणी धिंड काढण्यात आली, असा आरोप आहे.
पीडित मुलांपैकी काही मुले अनुसूचित जातीची असल्याने त्यांना पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणातील गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा., बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 74 आणि 75, बालकांची ओळख उघड करणे आणि त्यांच्याशी क्रूरतेने वागणे. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 120, 337 आणि संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदवले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या 11 पोलिसांमध्ये तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजेंद्र मकाशी याशिवाय सुनील हनवते, दिनेश टपके, मितेश चोरसले, सागर बोर्गे, सोहम शेंडकर, मंगेश पवार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्ना भिसे यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी करत आहे. या कारवाईने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एका हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता. या तपासाच्या नावाखाली पोलिसांनी 8 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. असा आरोप आहे कि मुलांना पोलीस चौकीत डांबून ठेवून विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेल्ट आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, पोलिसांनी या मुलांना पोलीस गाडीच्या बोनेटवर बांधून त्यांची परिसरात धिंड काढली. ज्यामुळे मुलांचे मानवाधिकार आणि सन्मान पूर्णपणे पायदळी तुडवले गेले.
मारहाण करताना आरोपी पोलिसांनी पीडितांना जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. घटनेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने आक्रमक भूमिका घेतली. आयोगाच्या आदेशानंतरच गुरूवारी 11 पोलिसांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला.