गेवराई! विष्णु राठोड
दि. २४, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे संचालक प्रो. अश्विन रांजणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. रजनी शिखरे होत्या.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रो. अश्विन रांजणीकर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त करत असतानाच स्वतःमध्ये विविध कौशल्ये विकसित केली पाहिजे. कौशल्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. दुसऱ्यांचे अनुकरण करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःमधील सुप्त गुण आणि क्षमता ओळखणे आवश्यक आहे. आपल्या आवडी व कौशल्यांना योग्य दिशा दिल्यास नोकरीबरोबरच व्यवसाय आणि उद्योगाच्या नव्या संधी निर्माण करता येतात’. आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य प्रो. डॉ. रजनी शिखरे म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांनी पारंपरिक मानसिकतेत बदल करून नव्या क्षेत्रांतील संधींचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी स्वतःला सतत घडवणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच विद्यार्थी आपले भविष्य अधिक सक्षमपणे घडवू शकतात’, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. रेवननाथ काळे यांनी केले. त्यांनी आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी मंचावर विज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. फारुकी, डॉ. नंदकिशोर खिल्लारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. विजय सांगळे, प्रो. प्रशांत पांगरीकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आशिष वाघुंबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली नावाडे हिने केले, तर कु. अमृता अंदुरे हिने आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रो. राजेश शेषम, डॉ. समाधान इंगळे, डॉ. संदीप वंजारी, डॉ. अमोल शिरसाट, डॉ. वृषाली गव्हाणे, डॉ. मारुती यमुलवाड, डॉ. महारुद्र जगताप, प्रा. शरद सदाफुले, प्रा. दौलत मंचरे, डॉ. सिद्धार्थ वाघमारे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
