महाराष्ट्र
डाउन सिंड्रोम असलेल्या पार्थची जिद्द, तर ७ वर्षीय आदीचा नवा विक्रम! दोन्ही सख्ख्या भावांची १८ किलोमीटर समुद्री भरारी.
भारतीय संघर्ष......

उरण दि. ३० (विठ्ठल ममताबादे) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही आव्हान अशक्य नसते, हे उरणमधील पार्थ निशांत पाटील आणि आदी निशांत पाटील या दोन सख्ख्या भावांनी आपल्या असामान्य कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. एलिफंटा लेणी (घारापुरी) ते नागाव-पिरवाडी बीच (उरण) असे सुमारे १८ किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण करत या दोन्ही भावांनी क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, डाउन सिंड्रोम असलेल्या पार्थने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले, तर अवघ्या सात वर्षांच्या आदीने हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू ठरण्याचा मान मिळवला आहे.
पार्थ निशांत पाटील हा १३ वर्षांचा असून तो सीबर्ड स्पेशल स्कूल, उरण येथे शिक्षण घेत आहे. तर त्याचा लहान भाऊ आदी निशांत पाटील हा अवघ्या ७ वर्षांचा असून सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल, उरण येथे इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांनाही लहानपणापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली. उरण येथील स्विमिंग पूलमध्ये त्यांनी पोहण्याचा सराव सुरू केला. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे त्यांची पोहण्यातील आवड अधिक दृढ होत गेली.
शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २:३० वाजता दोन्ही भावांनी घारापुरी (एलिफंटा लेणी) येथून समुद्रात पोहण्यास सुरुवात केली. सुमारे १८ किलोमीटरचे हे आव्हानात्मक समुद्री अंतर पार्थने ६ तास ५७ मिनिटांत, तर आदीने अवघ्या ५ तास ५६ मिनिटांत पूर्ण करून नागाव-पिरवाडी बीच येथे यशस्वीरीत्या लक्ष्य गाठले.
या संपूर्ण मोहिमेत अवघ्या सात वर्षांच्या आदी निशांत पाटील याची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. एवढ्या कमी वयात १८ किलोमीटरचा आव्हानात्मक समुद्री मार्ग पूर्ण करणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. आदीने केवळ ५ तास ५६ मिनिटांत हे अंतर पार करत आपल्या जलतरण कौशल्याची, धाडसाची आणि प्रचंड आत्मविश्वासाची चुणूक दाखवून दिली. या कामगिरीसह एलिफंटा लेणी ते नागाव-पिरवाडी बीच हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आदीने विशेष ओळख निर्माण केली आहे. मोठ्या भावासोबत समुद्रातील हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत आदीने उरणच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे.
दुसरीकडे, डाउन सिंड्रोम असलेल्या १३ वर्षीय पार्थची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. पार्थने तब्बल ६ तास ५७ मिनिटे समुद्रात सातत्याने पोहत १८ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. विशेष गरजा असलेल्या मुलांमध्येही अफाट क्षमता असते आणि योग्य प्रशिक्षण, संधी, प्रोत्साहन व कुटुंबाचा भक्कम आधार मिळाल्यास तेही उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हा सकारात्मक संदेश पार्थने आपल्या कामगिरीतून समाजासमोर ठेवला आहे. डाउन सिंड्रोम असलेल्या विद्यार्थ्याने हा समुद्री मार्ग पूर्ण करण्याची ही महाराष्ट्रातील पहिली कामगिरी असल्याचे सांगितले जात आहे.


