महिला महाविद्य(
गेवराई, दि. २५ (प्रतिनिधी) : जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभाग व रेड रिबन क्लबच्या वतीने विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथील एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राला (आयसीटीसी) शैक्षणिक भेट देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी दिवाण, प्रा. डॉ. संगिता आहेर आणि प्रा. बाबू वादे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी आयसीटीसी केंद्राचे समुपदेशक श्री. सुनील सरवदे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. विक्रम तिडके यांनी विद्यार्थिनींना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी प्रक्रिया आणि समुपदेशनाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच या संसर्गाबाबतचे गैरसमज दूर करून एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता सन्मानाने वागणूक देण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्यविषयक ज्ञान मिळावे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेली ही शैक्षणिक भेट उपयुक्त ठरली.