महाराष्ट्र

एच.आय.व्ही. एड्स जनजागृतीत युवांची भूमिका महत्त्वाची.- सुनील सरवदे ============= महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा.

भारतीय संघर्ष न्यूज...

गेवराई / विष्णु राठोड
दि. १२ (प्रतिनिधी) एच.आय.व्ही. एड्स विषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याबरोबरच गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात युवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालय, गेवराईचे सुनील सरवदे यांनी केले. ते महिला महाविद्यालय, गेवराई येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लब अंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच उपजिल्हा रुग्णालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रिबन क्लब अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘एच.आय.व्ही. एड्स जनजागृती आणि युवांची भूमिका’ या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे होते, तर उपजिल्हा रुग्णालय, गेवराईचे सुनील सरवदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुनील सरवदे यांनी एच.आय.व्ही. आणि एड्सविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज व्यक्त केली. एच.आय.व्ही.चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षित वर्तन, वेळेवर तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. युवावर्ग हा समाजातील परिवर्तनाचा प्रमुख घटक असून, एच.आय.व्ही. एड्स विषयी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. बाबू वादे व विक्रम तिडके यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले तर सामाजिक कार्यकर्त्या शितल गोचडे यांनी विद्यार्थ्यीनींशी संवाद साधून एड्स बद्दल असणारे गैरसमज दूर केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांनी युवकांनी आरोग्यविषयक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केले. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींकडे भेदभावाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांना सामाजिक आधार व सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचे कार्य सातत्याने केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी दिवाण यांनी केले. सूत्र संचालन प्रा. रवींद्र चौधरी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका, रेड रिबन क्लबचे सदस्या तसेच विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button