उरण, दि. ३० (विठ्ठल ममताबादे) उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा – २०२६’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू असून आकर्षक सजावट, भव्य गणेशमूर्ती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या गणेशोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मंडळाच्या वतीने श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी उरण शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक भक्त मोठ्या संख्येने मंडपात दाखल होत असून, दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘एक ताल, एक नाद, गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.

यंदा मंडळाने गणेशमूर्तीची आकर्षक सजावट, श्री एकवीरा देवी कार्ला गड देखावा तसेच नेत्रदीपक रोषणाई केली असून, सजावटीमुळे गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधले जात आहे. मंडळाच्या वतीने आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस, हौशी स्पर्धा व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांना भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.मंडळाचे अध्यक्ष तेजस म्हात्रे, संस्थापक ओमकार घरत व उपाध्यक्ष मयूर केकतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी दर्शन व इतर धार्मिक कार्यक्रमांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, कला-संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपण्याचा संदेश मंडळाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेशही मंडळा मार्फत देण्यात येत आहे.गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे उत्साहात स्वागत करण्यात येत असून, परिसरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“गणरायाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख-समृद्धी लाभो,” अशी प्रार्थना मंडळाच्या पदाधिकारी व भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे.
Back to top button
