नवी दिल्ली/ (प्रतिनिधी)
डीजेचा कर्णकर्शक आवाज आता जिवघेणा ठरू लागला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बलरामपुर येथील एका खासगी शाळेतून समोर आली. येथे गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजामुळे इयत्ता दुसरीतील 7 वर्षीय चिमुकलीचा वर्गातच मृत्यू झाला. वैष्णवी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेचे मन हेलावून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, 21 सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू असताना शाळेबाहेरून गणेश विसर्जनाची मिरवणूक जात होती. या मिरवणुकीत अत्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. शाळेतील शिक्षकांच्या दाव्यानुसार, डीजेचा आवाज आणि त्याचा बेस इतका प्रचंड होता की वर्गातील खिडक्यांच्या काचा थरथरत होत्या
या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे आणि कंपनांमुळे वैष्णवीची प्रकृती अचानक बिघडली आणि ती अस्वस्थ झाली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, इतर मुले मिरवणूक पाहण्यासाठी वर्गाबाहेर जात असताना वैष्णवी तिच्या जागेवरच बसून राहिलेली दिसते. असह्य आवाजामुळे ती जागेवरच दोन ते तीन वेळा बेशुद्ध होऊन पडल्याचे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
वर्गात ती बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी तिला तातडीने जिल्हा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला असावा.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित डीजे मालक आणि चालकाला अटक केली आहे. तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस चौकी प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आगामी सणांच्या काळात म्युनिसिपल क्षेत्रात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. या घटनेमुळे सण-उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या वापरावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.