पुणे/मुळशी (प्रतिनिधी) मुळशीतील भुगाव येथील सोमेट सोसायटीत वास्तव्यास असलेल्या जगदाळे कुटुंबावर काळाने घाला घातला. पुण्याहून जालन्याकडे जात असताना समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात प्रतीक रामकिसन जगदाळे, त्यांची पत्नी श्रेया प्रतीक जगदाळे आणि मुलगा रुद्रांश प्रतीक जगदाळे यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास वेरूळ-दौलताबाद परिसरातील चॅनेल क्रमांक ४४९.५ येथे हा अपघात झाला.
प्रतीक जगदाळे हे आयटी इंजिनिअर होते. प्रतीक यांच्या लहान भावाचे लग्न असल्याने आई-वडिलांना सरप्राईज देण्यासाठी हे कुटुंब पुण्याहून जालन्याकडे कारने निघाले होते. प्रवासादरम्यान कारची समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनरखाली घुसून चक्काचूर झाला. मदत पथकाने कटरच्या सहाय्याने कारचे पत्रे कापून तिघांचे मृतदेह बाहेर काढले.

जगदाळे कुटुंब मूळचे जालना येथील असून गेल्या काही काळापासून मुळशी तालुक्यातील भुगाव येथील सोमेट सोसायटीत वास्तव्यास होते. कुटुंबातील तिघांचा एकाच अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू समोर आल्याने भुगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भावाच्या लग्नासाठी आई-वडिलांना सरप्राईज देण्याच्या आनंदी प्रवासाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने जगदाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Back to top button
