महाराष्ट्र

महिला महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचा उत्साहात समारोप

भारतीय संघर्ष न्यूज.....

गेवराई-विष्णु राठोड
===============
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हिंदी भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आजही विविधतेने नटलेल्या भारतात राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी भाषा महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे, असे प्रतिपादन प्रो. मारोती यमुलवाड यांनी केले. ते गेवराई येथील महिला महाविद्यालयात आयोजित हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, गेवराई द्वारा संचालित महिला महाविद्यालय, गेवराई येथे हिंदी विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताहाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बलभीम महाविद्यालय, बीड येथील प्रो. मारोती यमुलवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. तात्याराम सोंडगे होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रो. यमुलवाड म्हणाले की, हिंदी भाषा देशातील विविध प्रांत, संस्कृती आणि समाजघटकांना जोडण्याचे कार्य करते. त्यामुळे हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचा महत्त्वपूर्ण दुवा ठरते. विद्यार्थिनींनी हिंदी भाषेचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून हिंदी भाषा व साहित्याशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. तात्याराम सोंडगे म्हणाले की, हिंदी ही देशातील सर्वाधिक बोलल्या व समजल्या जाणाऱ्या भारतीय भाषांपैकी एक आहे. यामध्ये लोकसंख्येचा घटकही महत्त्वाचा आहे. वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी भाषिक कौशल्ये महत्त्वाची आहेत. आपण अधिकाधिक भाषा आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधीही वाढतात. त्यामुळे विद्यार्थिनींनी भाषिक मर्यादा न ठेवता बहुभाषिक होऊन ज्ञानसंपन्न व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिंदी विभागाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘उड़ान’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हिंदी विभागप्रमुख प्रो. संगिता आहेर यांनी प्रास्ताविकात हिंदी सप्ताहांतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रो. रामहरि काकडे यांनी केले, तर प्रो. दत्ता तंगलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button