महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; पुण्यातील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू ,

भारतीय संघर्ष न्यूज.....

भारतीय संघर्ष न्यूज नेटवर्क…..

पुणे | प्रतिनिधी

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेसवे) मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) बोगद्यात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्यूनर कारने समोरून जात असलेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने आपल्या फॉर्च्यूनर कारने प्रवास करत होते. मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंक बोगद्यात त्यांच्या कारची समोर चाललेल्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

३ ते ४ जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

या अपघातात कारमधील अन्य ३ ते ४ जण जखमी झाले असून, त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इतर जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

” अपघातानंतर वाहतूक कोंडी “

अपघातानंतर मिसिंग लिंक बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली तसेच जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, तुषार भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

” परिसरात शोककळा “

तुषार भूमकर हे वाकड परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महापालिका निवडणूकही लढवली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे वाकडसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विविध राजकीय आणि सामाजिक स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button