गेवराई/विष्णु राठोड
शिक्षकाची निष्ठा, ग्रामस्थांची इच्छाशक्ती आणि लोकसहभागाची ताकद यांची सांगड घातली तर ग्रामीण भागातील शाळेचे चित्र बदलू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी येथे पाहायला मिळत आहे. सहशिक्षक विष्णू आडे यांच्या पांढरी शाळेतील सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून, या कालावधीत लोकसहभागातून शाळेच्या भौतिक सुविधांसह शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना मोठी चालना मिळाली आहे.

माजी विद्यार्थी मेळाव्यातून लोकसहभागाला सुरुवात
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून शाळा विकासासाठी लोकसहभागाची चळवळ उभी राहिली. त्यानंतर ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती तसेच दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने योगदान देत शाळेच्या विकासकामांना हातभार लावला.
शाळेच्या परिसरातील खोलगट भागात ग्रामस्थांच्या सहकार्याने ६० ट्रिप मुरूम टाकून मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले. शाळेच्या सुरक्षिततेसाठी तारेचे कुंपण व लोखंडी गेट उभारण्यात आले. विशेष म्हणजे एका दानशूर व्यक्तीने शाळेसाठी ६ गुंठे जागा दान दिली. या जागेलाही लोकसहभागातून तारेचे कुंपण व गेट बसविण्यात आले.
श्रमदानातून उभी राहिली संरक्षक भिंत

शाळेच्या संरक्षक भिंतीसाठीही ग्रामस्थ आणि पालकांनी पुढाकार घेतला. कुणी वाळू दिली, कुणी विटा, कुणी सिमेंट, तर काहींनी प्रत्यक्ष श्रमदान करून मिस्त्रीकाम केले. त्यामुळे लोकसहभाग हा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न राहता साहित्यदान, श्रमदान आणि सामाजिक बांधिलकीच्या रूपात प्रत्यक्ष कृतीत उतरला.
भौतिक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा,
एका वर्षात शाळेतील भौतिक सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली. वर्गखोल्यांमध्ये लाईट फिटिंग व पंख्यांची व्यवस्था करण्यात आली. इन्व्हर्टर दुरुस्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आला. शौचालय व इतर कामांसाठी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात आली. हॅन्डवॉश स्टेशन आणि किचन शेडची उभारणी करण्यात आली.
बंद पडलेले संगणक व टीव्ही कार्यान्वित करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात पेवर ब्लॉक बसविण्यात आले, तर शाळेसमोरील उघडी नाली बंदिस्त करण्यात आली.
३१ वृक्षांची लागवड; परसबागेचे काम सुरू
शाळेच्या परिसरात ३१ वृक्षांची लागवड करण्यात आली असून, झाडांसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळेत परसबाग उभारण्याचे काम सुरू आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य यांनाही उपक्रमांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
भौतिक सुविधांसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही विविध उपक्रम राबविण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा उपक्रम, स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग, आनंद नगरी, परिसर सहल, आरोग्य तपासणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी गावातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वारकरी दिंडी काढण्यात आली.
“लोकसहभाग हीच परिवर्तनाची खरी ताकद”
याबाबत सहशिक्षक विष्णू आडे म्हणाले, “पांढरी शाळेतील हा बदल एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि दानशूर व्यक्तींनी शाळेला आपलीच शाळा समजून सहकार्य केले. कुणी आर्थिक मदत केली, कुणी साहित्य दिले, तर कुणी श्रमदान केले. लोकसहभाग हीच या परिवर्तनाची खरी ताकद आहे.”
आजपर्यंत शाळेला आठ लाख 37 हजार रुपयाचा लोकसहभाग जमा झालेला आहे.
या प्रवासात सहकारी शिक्षक आशिष फुलझळके व शहादेव काळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षपूर्ती; पुढील वाटचालीचा संकल्प
पांढरी शाळेतील सेवेच्या वर्षपूर्तीनिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांकडून विष्णू आडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
“एक वर्ष पूर्ण झाले म्हणजे प्रवास संपला नाही. उलट नव्या ध्येयाने पुढे जाण्याची ही सुरुवात आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या विकासासाठी भविष्यात अजूनही खूप काही करायचे आहे. हा सेवायज्ञ अविरत सुरू राहील,” असा निर्धार आडे यांनी व्यक्त केला.
लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या विकासकामांमुळे पांढरी जिल्हा परिषद शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता गावाच्या सामूहिक सहभागाचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
Back to top button
