गेवराई ! विष्णु राठोड: भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ऑगस्ट क्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या या क्रांतिकारी आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली, असे प्रतिपादन प्रा. गोकुळदास कदम यांनी केले. ते महिला महाविद्यालयात ‘क्रांती दिन’ कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय, गेवराई येथे ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे होते. याप्रसंगी बोलताना प्रा. गोकुळदास कदम म्हणाले की, महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा देत ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्णायक लढ्याचे आवाहन केले. ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेने देशातील जनतेमध्ये स्वातंत्र्याची तीव्र जाज्वल्य भावना निर्माण झाली. या आंदोलनात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा मिळाली. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे यांनी क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या आंदोलनाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यीनींनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास सावंत यांनी केले. सूत्र संचालन डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजाभाऊ चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.