महाराष्ट्र

तलवाड्यातील अवैध धंदे आणि मद्यपींचा बंदोबस्त करा; स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवस्मारक समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व तलवाडा पोलिसांना निवेदने सादर; महापुरुषांच्या पुतळ्याजवळील बंद सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी

भारतीय संघर्ष.....

 

गेवराई! विष्णु राठोड,

गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात अवैध धंदे आणि मद्यपींच्या सुळसुळाटामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने’ पोलीस अधीक्षक (बीड), तहसीलदार (गेवराई) व तलवाडा पोलिसांना निवेदन दिले. त्यापाठोपाठ १४ नोव्हेंबर रोजी ‘शिवस्मारक समिती व समस्त शिवभक्तांनी’ तलवाडा पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही निवेदनांद्वारे प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीत सध्या बेकायदेशीर वाळू उपसा, मटका, जुगार क्लब, गुटखा आणि ढाब्यांवर अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. तसेच, रात्रीच्या वेळी चौकाचौकात तरुणांची टोळकी उभी राहून दहशत निर्माण करत आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १२ नोव्हेंबर रोजी बीडचे पोलीस अधीक्षक, गेवराई तहसील कार्यालय व तलवाडा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. विशेष पथकाद्वारे हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत आणि गावातील तीन महापुरुषांच्या पुतळ्याजवळील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे, उप युवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन, तालुकाध्यक्ष सुनीता गिल, बाळासाहेब शेंडगे, जयदेव शिंगणे व बाळू डहाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, समस्त शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे पावित्र्य रात्रीच्या वेळी मद्यपींकडून धोक्यात आणले जात आहे. स्मारकासमोरच दारू पिऊन गोंधळ घालणे, शिवीगाळ आणि भांडणे करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे गावातील शांतता भंग होत असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याविरोधात शिवस्मारक समिती व समस्त शिवभक्तांच्या वतीने दि. १४ नोव्हेंबर रोजी तलवाडा पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) वाढवण्याची आणि मद्यपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर अनिकेत नाटकर, गोपाल शिंदे, बळीराम माने, विलास लव्हाळे, विजय मरकड, किरण मरकड, राम चौधरी, सिद्धू काळे, विशाल शिंदे यांच्यासह समस्त शिवभक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने या दोन्ही निवेदनांची तातडीने दखल न घेतल्यास समस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button