महाराष्ट्र
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. ४० वर्षाच्या संघर्षाला आता न्यायालयीन लढ्यामुळे मिळाली निर्णायक दिशा.
भारतीय संघर्ष न्यूज.....

उरण दि. १३(विठ्ठल ममताबादे )जेएनपीटी (जेएनपीए )हे जागतिक बंदर रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात समुद्रकिनारी असून हे बंदर स्थापन होताना येथील मूळ स्थानिक रहिवाशी असलेल्या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी कायमचे योग्य ते पुनर्वसन न करता तात्पुरते इतर ठिकाणी हालवले. जुना शेवा कोळीवाडा येथे बंदर साठी जागा संपादित केली त्यामुळे येथील रहिवाशी यांना अनुक्रमे हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा येथे तात्पुरते पुनर्वसन केले. पुनर्वसन केलेल्या जागी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कोणतेही मूलभूत सेवा सुविधा पुरविल्या नाहीत व योग्य ते पुनर्वसन सुद्धा केले नाही. त्यामुळे अनेक वेळा, वारंवार संप, उपोषण, आंदोलन,लोकशाही व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा ४० वर्षे उलटून सुद्धा आजही विस्थापितांना, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नाही. त्यांच्या सर्व मागण्या सुरवातीपासूनच प्रलंबित राहिल्या. केंद्र व राज्य शासन कोणतेही दाद देत नसल्याने सदर प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात गेला. व तिथे या प्रश्नावर कायदेशीर लढाई सुरु झाली.व याबाबतीत केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर व प्रकल्पग्रस्त, विस्थापित यांच्यावर ४० हुन जास्त वर्षे होत असलेल्या अन्यायाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही केंद्र सरकार व राज्य सरकारने पुनर्वसन न केल्याने न्यायलयाने सकारात्मक पाऊले उचलत पुनर्वसन लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत.



