गेवराई! विष्णु राठोड…
, दि. १६, मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित “Mathematics and its Applications” या विषयावरील २२ वी अंतिम सेमिनार स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयात नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील विविध महाविद्यालयांतून प्राथमिक पातळीवर निवडलेल्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गणिताशी संबंधित विविध विषयांवर संशोधनपर सादरीकरणे केली.
या स्पर्धेत र. भ. अट्टल महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची आर्डे हिने “Application of Mathematics in Rocket Propulsion” या विषयावर प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. रॉकेटच्या गतीमध्ये गणिताचे असलेले महत्त्व, विविध गणितीय समीकरणे व त्यांचा अवकाश विज्ञानातील उपयोग याविषयी तिने सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली.
तसेच याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी सय्यद आयेशा हिने “An Overview of Vedic Arithmetic” या विषयावर सादरीकरण करत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. वैदिक गणितातील विविध जलद गणना पद्धती, त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात होणारा उपयोग आणि गणित शिकण्याची सुलभता याविषयी तिने आकर्षक पद्धतीने माहिती मांडली.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गणित विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी रूपनार, प्रा. विनोद यादव, प्रा. आदित्य लगड हे उपस्थित होते.
Back to top button
