गेवराई ! विष्णु राठोड…
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे गेवराई येथील र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील गणित व संगणकशास्त्र विभागाच्या वतीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘Computing Innovations and Applied Mathematics (NCCIAM-2026) या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
परिषदेचे उद्घाटन डॉ. एम. बी. ढाकणे (माजी गणित विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात संगणकीय नवकल्पना, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि अनुप्रयुक्त गणित यांचे आजच्या संशोधन व उद्योग क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशोधनाच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणित व संगणकशास्त्र क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास डॉ. जे. ए. नन्नावरे (अध्यक्ष, गणित अभ्यास मंडळ, छत्रपती संभाजीनगर) यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी गणितीय व संगणकीय कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. तसेच संशोधन, नवकल्पना व गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी डॉ .बी. आर. सोनटक्के (माजी अध्यक्ष, गणित अभ्यास मंडळ, छत्रपती संभाजीनगर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी परिषदेचे उद्दिष्ट सांगताना या विषयाची निवड करण्यामागील हेतू तसेच विभागाची शैक्षणिक व संशोधनपर वाटचाल यांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राजेश शेषम यांनी उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन केले. यावेळी शोधनिबंध सारांश पुस्तिका आणि प्रा. स्वाती कुलकर्णी यांनी लिहिलेले डेटा स्ट्रक्चर या पुस्तकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषण करताना डॉ .एम. बी. पाटील, (गणित विभाग, तुमकूर विद्यापीठ, कर्नाटक) यांनी मार्गदर्शन केले.
“Numerical Wavelet Analysis of Linear and Non-Linear Ordinary Differential Equations” या विषयावर बोलताना त्यांनी वेव्हलेट विश्लेषणाची संकल्पना, त्याचे संख्यात्मक पद्धतींमधील महत्त्व याचे सविस्तर विवेचन केले. संशोधन क्षेत्रात आधुनिक संगणकीय साधनांचा वापर करून, अधिक अचूक व परिणामकारक निष्कर्ष कसे मिळवता येतात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. बी. आर. सोनटक्के यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विषयाची उपयुक्तता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी नव्या गणितीय पद्धती आत्मसात करण्याचे आवाहन केले.
डॉ. एस. के. पांचाळ, डॉ. पी. एल. यन्नावार यांनी सहभागी संशोधक प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्य जी. के. सानप, डॉ. शेख सादिक, प्राचार्य व्ही. बी. कुलकर्णी यांनी विविध सत्रांचे अध्यक्षपद भूषवले. तर डॉ. भगत, डॉ. गव्हाणे, डॉ. जाधव, प्रा. भराडे यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य डॉ. पांगरीकर, डॉ. रुपनर, डॉ. हेळंबे, डॉ. पागोरे यांनी विशेष सहकार्य केले.
सर्व सत्रांना आणि समारोपाला सर्व विषयतज्ञ, मार्गदर्शक, सत्रांचे अध्यक्ष आणि संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ सुरू झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत चर्चासत्राच्या अनुषंगाने विभिन्न विषयांवर चर्चा होऊन, राष्ट्रीय चर्चासत्व यशस्वी पार पडले.
चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य विजय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. यादव, प्रा. लगड, प्रा. कुलकर्णी, प्रा. जाधव आदींनी परिश्रम घेतले.
Back to top button
