गेवराई-विष्णु राठोड,
गेवराई, दि. १२, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राच्या वतीने विश्वबंधुत्व दिन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. विश्वबंधुत्व दिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. देव रिठे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजच्या काळात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेमध्ये एकता, सहिष्णुता आणि मानवतेची भावना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वबंधुत्व दिन आपल्याला संपूर्ण मानवजात एक कुटुंब आहे, हा संदेश देतो. स्वामी विवेकानंदांचे विचार स्वीकारून प्रेम, शांतता, समानता आणि बंधुभाव वाढवणे हीच या दिवसाची खरी प्रेरणा आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख व आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक डॉ. रेवणनाथ काळे यांनी केले. याप्रसंगी मंचावर डॉ. मारुती यामुलवाड, प्रा. गणेश सूर्यवंशी, डॉ. मनोज ठोसर डॉ. सचिन शिंगाडे, डॉ. उदय खरात, डॉ. दीपक डोंगरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.