महाराष्ट्र

जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी साहेब, ‘उघडा डोळे बघा नीट’! अनिल बोर्डे यांची आक्रमक भूमिका…. =================== बीड जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना रखडली; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा….

भारतीय संघर्ष न्यूज.....

 

गेवराई ! विष्णु राठोड…

बीड जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा स्तरावर आणि शासकीय पातळीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील लाखो ग्राहकांचे प्रश्न आणि समस्या प्रलंबित आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांचे या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, “आता तरी उघडा डोळे आणि बघा नीट” अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका ग्राहक पंचायत महाराष्ट्र (नोंदणीकृत) संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अनिल गोविंदराव बोर्डे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या अधिकृत व नोंदणीकृत संघटनेच्या वतीने आवश्यक ती सर्व कायदेशीर कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडे वेळेत सादर करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणेने अद्याप त्यावर कोणताही निर्णय किंवा विनिमय केलेला नाही. शासकीय कामातील या दिरंगाईमुळे आणि लालफितीच्या कारभारामुळे ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये सध्या तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

ज्या प्रतिनिधींची नावे सुचवण्यात आली आहेत, ते संघटनेचे अधिकृत कार्यकर्ते असून गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक प्रबोधन, जनजागृती आणि ग्राहक हक्कांच्या रक्षणासाठी सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा अनुभवी कार्यकर्त्यांना समितीत स्थान देऊन तात्काळ ग्राहक संरक्षण परिषद बीडची समिती व विशेष कक्ष स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे ग्राहकांच्या दैनंदिन समस्यांचा निपटारा करणे प्रशासनाला सोयीचे झाले असते. परंतु, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी जिल्हास्तरावर सातत्याने पत्रव्यवहार व विनंत्या करूनही पुरवठा विभागाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर आता जिल्ह्यातील ग्राहक संतप्त झाले आहेत. ” शिवकुमार स्वामी साहेब, आता तरी उघडा डोळे बघा नीट” असा थेट इशारा अनिल बोर्डे यांनी दिला आहे.या प्रलंबित प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ समितीची निर्मिती करावी आणि ग्राहकांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या आक्रमक भूमिकेनंतर बीड जिल्हा प्रशासन नेमकं काय पाऊल उचलणार आणि याकडे कधी लक्ष देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून राजकीय व सामाजिक वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button