भारतीय संघर्ष न्यूज,
बीड !गेवराई /विष्णु राठोड
दि.१८ अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी मानवी हक्क अभियानाच्या वतीने ‘अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी लाभवंचित घटकाची सामाजिक न्याय परिषद’ शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद मराठवाडा महसूल प्रबोधिनी प्रशिक्षण संस्था, संभाजीनगर येथे होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन राजस्थानचे महामहीम राज्यपाल मा. ना. श्री. हरिभाऊ बागडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. तेलंगणातील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते तथा मादिगा रिझर्वेशन पोराटा समितीचे अध्यक्ष पद्मश्री मंद कृष्णमादिगा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. सुनील भाऊ कांबळे, आमदार, हडपसर, पुणे आणि मा. अमित गोरखे, आमदार, विधान परिषद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील प्रा. डॉ. मिलिंद आवाड भूषविणार आहेत.
सकाळी ११ या परिषदेचे उद्घाटन होणार असून
परिषदेत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विविध पैलूंवर तीन महत्त्वपूर्ण परिसंवाद सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीचे आकलन’ या विषयावर सत्र होणार आहे. या सत्रात मा. गणपत भिसे, मा. रामचंद्र भरांडे, मा. केशव शेकापूरकर, मा. मारुती वाडेकर आणि मा. अंकुश गोतावळे सहभागी वक्ते म्हणून आपले विचार मांडतील. या सत्राचे अध्यक्षस्थान दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र साकाटे भूषवतील.
दुपारी ‘आरक्षण वर्गीकरण : वर्तमान व भविष्य’ या विषयावर तिसरे सत्र होईल. यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष मा. विष्णू कसबे, अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष मा. सचिन साठे, मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष मा. अविनाश बागवे आणि एस. बी. कॉलेज, संभाजीनगरचे उपप्राचार्य मा. संजय गायकवाड सहभागी होतील. या सत्राचे अध्यक्षस्थान मा. सुधाकर भालेराव, अध्यक्ष, मातंग शक्ती सामाजिक संघटना भूषवतील.
संध्याकाळी ‘आरक्षण वर्गीकरण व समाजविचार’ या विषयावर अंतिम सत्र होणार आहे. या सत्रात मा. संजय ठोकळ, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया; मा. सचिन बगाडे, अध्यक्ष, दलित युवक आंदोलन; मा. विजय अंभोरे आणि मा. विकास पाथरीकर, अध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा सहभागी वक्ते म्हणून विचार मांडतील. या सत्राचे अध्यक्षस्थान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे भूषवतील.
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील अंतर्गत विषमता, सामाजिक-शैक्षणिक मागासलेपणा, आरक्षणाच्या लाभांचे असमान वितरण आणि लाभवंचित घटकांना संविधानिक चौकटीत न्याय्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरणाची आवश्यकता या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या चळवळीचा अनुभव, वर्तमान स्थिती, भविष्यातील दिशा आणि समाजविचार या चार प्रमुख अंगांनी परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
परिषदेच्या शेवटी मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष मा. मच्छिंद्र गवाले आभार प्रदर्शन करतील.
या सामाजिक न्याय परिषदेला सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष धोंडीबा हातागळे यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे.