भारतीय संघर्ष न्यूज वृत्तसेवा…
पुणे (प्रतिनिधी)-
पुणे मनपा निवडणुकीत आमदार आणि खासदारांनी त्यांच्या मुला मुलींसाठी तसेच नातेवाईकांसाठी शिफारस केलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही असा निरोप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेला आहे.
त्यामुळे प्रतिष्ठापनाला लावलेल्या माननीयांना जोरदार झटका बसला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 165 जागांवर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यात 2300 पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज सादर केलेले आहेत. पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा असताना अन्य पक्षातील दहापेक्षा माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे.
पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यावरून प्रचंड स्पर्धा असताना आमदारांच्या खासदारांच्या घरात उमेदवारी गेल्यास त्यामुळे पुन्हा नाराजी उफाळून येऊ शकते व निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो. या विचाराने शनिवारी रात्री उशिरा आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये त्यामुळे सुधारित यादी प्रदेशाकडे पाठवावी असा निरोप आल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिलेली आहे.
त्यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशी स्थिती आहे. त्यातच शहरातील काही आमदार, खासदारांनी त्यांच्या मुलांना जवळच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केलेली आहे. मात्र पक्षाने आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे. तसेच एखादा नातेवाईक पूर्वीपासून भाजपमध्ये काम करत असेल तर अशा इच्छुकला उमेदवारी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.