पुणे : नियमित तपासणी न केल्यामुळेच मोठमोठे आजार होतात. आधी जरासं असलेले दुखणं, वेळेत औषध उपचार न केल्यामुळेच मोठे होते. रक्त तपासण्या किंवा आजार छोटासा असतानाच निदान न झाल्यामुळेच आजार मोठा होतो. झोपडपट्टीतील, गरीब वस्ती मधील नागरिक, हातावर पोट असणारे मजूर आणि वृद्ध नागरिकांच्याकडे यासाठी अजिबातच पैसे नसतात. अशा वेळी दवाखान्यात केल्या जाणाऱ्या तपासण्या आणि मेडिकल दुकानातील औषधांचा खर्च सहाशे सातशे रुपये सुद्धा केला जात नाही. स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे वेळोवेळी केलेल्या दुर्लक्षामुळे मोठा आजार बळावतो आणि सहा सात लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांचे हॉस्पिटलचे बिल येते. त्यावेळी झोपडीत राहणाऱ्या माणसाचं मरण अधिक अडचणीचे ठरते.

या पार्श्वभूमीवर पुण्यात रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी स्वतःच्या हिमतीवर पुण्यात अद्ययावत दवाखाना उभा केलाय. त्यासाठी स्वतःचे २५ लाख रुपये त्यांनी कर्ज घेऊन खर्च केले. टाटा विंगर वाहणासाठी जनता सहकारी बँकेचे कर्ज घेऊन अद्ययावत ‘व्हॅनिटी’ दवाखाना निर्माण केला.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, एकाच ठिकाणी दवाखाना निर्माण केला असता तर सगळीकडे सेवा देता आली नसती. प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी व औषध उपचार केले जात आहेत.

कष्टकऱ्यांचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी १० रुपयातच कष्टाची झुणका भाकर केंद्र सुरु केले होते. तीच प्रेरणा घेऊन गरिबांना चांगले दर्जेदार उपचार, तपासण्या व मोफत औषधोपचार फक्त पाच रुपयात देण्याचा निर्णय रुग्ण हक्क परिषदेतर्फे घेतला. आतापर्यंत १०७ ठिकाणी हा फिरता दवाखाना सेवा देत आलाय. पुण्यातील ६० ठिकाणी ही सेवा दिली जात आहे. यामध्ये दोन डॉक्टर, दोन नर्स, वाहन चालक, एक समन्वयक, दोन मदतनीस कार्यरत आहेत. यातील रुग्णांची एमआरआय व सिटी स्कॅन सारख्या टेस्ट सुद्धा मोफत केली जाते तर गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक तत्परतेने आर्थिक मदत करतात.
रुग्ण हक्क परिषदेचीच संलग्न संस्था ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातूनच पृथ्वी मोबाईल क्लिनिक नावाने हा फिरता दवाखाना आता पुणेकरांना परिचित झाला आहे. यासाठी दररोजचा खर्च १२ हजार येत असून दर महिन्याला ३ लाख ६० हजार रुपये खर्च उमेश चव्हाण स्वतः करीत आहेत. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या या कर्तुत्वाचे व दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पृथ्वी मोबाईल क्लिनिक या फिरत्या दवाखान्यामध्ये आत्तापर्यंत दहा हजार रुग्णांनी तपासणी केली असून ही आरोग्य सेवा अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
“गरिबांना वेळेत तपासणी व औषधोपचार मिळाले तर मोठमोठे आजार टाळता येतात. पैशाअभावी कोणाचंही उपचाराअभावी नुकसान होऊ नये, म्हणूनच आम्ही फक्त पाच रुपयांत दर्जेदार सेवा देण्याचा निर्णय घेतला. ही केवळ सेवा नाही, तर आरोग्याबाबत जनजागृतीची चळवळ आहे,” असे उमेश चव्हाण यांनी सांगितले.
गरिबांना सन्मानाची वागणूक मिळावी व त्यांच्यावर दर्जेदार उपचार व्हावेत. गरिबांना मोफत औषधे मिळावी त्यासाठी उमेश चव्हाण यांनी प्रेरणादायी आरोग्य चळवळ उभी केली आहे तिला साथ देऊया.
Back to top button
