गेवराई : विष्णु राठोड….
गेवराई तालुक्यातील मुळूकवाडी येथे प्रभाग रचनेच्या कामासाठी गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला काही व्यक्तींनी अडवून पैशाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी गोविंद साळवे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग रचनेच्या अनुषंगाने मुळूकवाडी गावात पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी गोविंद साळवे हे मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गावात गेले होते. यावेळी ते कर्तव्यावर असताना गावातील श्रीराम मोतीराम कोकाटे, ज्ञानेश्वर अर्जुन वाघ, केरबा आसाराम पवार, बय्याजी भिमराव जाधव, ज्ञानेश्वर बय्याजी जाधव, सिध्देश्वर आसाराम वाघ, योगेश आसाराम वाघ आदींनी संगनमत करून त्यांना अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदरील व्यक्तींनी तुम्ही गावात कोणाला विचारून आलात? अशी विचारणा करत गावात करण्यात आलेली विकासकामे बोगस असल्याचा आरोप केला. त्यानंतर संबंधितांनी पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास गावाबाहेर जातोच कसा ते पाहू आणि जीवे मारू अशी धमकीही दिल्याचे ग्रामविकास अधिकारी साळवे यांनी सांगितले आहे.
याशिवाय ग्रामविकास कामात अडथळा आणणे, ब्लॅकमेलिंग करणे आणि सतत त्रास देणे अशा प्रकारांमुळे प्रशासनाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी गोविंद साळवे यांना वारंवार त्रास देऊन गावातील विकासकामांमध्ये अडथळा आणला जात असल्याने गावातील अनेक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धमकावून विकासकामे रोखण्याचा प्रयत्न होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी गोविंद साळवे, सरपंच स्वाती नितीन साबळे तसेच ग्रामस्थांकडून होत आहे.
Back to top button
