बीड/गेवराई !विष्णु राठोड…
दि. २५ मार्च — बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्र पोहरागड येथे यंदा चैत्र नवरात्री निमित्त दुहेरी ऐतिहासिक सोहळा पार पडणार असून अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळावा आणि माताजी मंदिरावर प्रथमच हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे प्रदेश संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे.
बंजारा ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास देशभरातील संत-महंत व बंजारा समाजातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आमदार धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज, अनंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज, महंत यशवंत महाराज, महंत रमेश महाराज, महंत खुशाल महाराज, महंत प्रकाश महाराज यांच्यासह अनेक मान्यवर या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या पुढाकारातून पोहरागडावरील पवित्र माताजी मंदिरावर इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सकाळी ९ वाजता होणाऱ्या या सोहळ्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या उपक्रमामुळे संपूर्ण बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी लाखो भाविक माता जगदंबा, संत सेवालाल महाराज व रामराव बापू यांच्या दर्शनासाठी पोहरागड येथे येतात. मात्र यंदाचा सोहळा विशेष ठरणार असून धार्मिक आणि सामाजिक एकजुटीचा अनोखा संगम या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
याच दिवशी पोहरादेवी येथे सायंकाळी ५ वाजता बामणगाव रोडवरील महाराज मंदिर मैदानात अखिल भारतीय बंजारा समाज जनजागृती मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा होणार असून विशेषतः एसटी आरक्षणासह विविध महत्त्वाच्या विषयांवर दिशा ठरवली जाणार आहे.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून लाखोंच्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे. समाजाच्या एकजुटीचा संदेश देणाऱ्या या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व भटक्या-विमुक्त बंजारा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार विष्णु राठोड तथा बंजारा बिग्रेड बीड जिव्हा प्रसिद्धि प्रमुख यांनी केले आहे.