गेवराई ! विष्णु राठोड…
८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी येथे शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील आणि परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.राष्ट्रमाता जिजाऊ आणि विद्येची माऊली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक श्री विष्णू आडे यांनी सांगितले की, ८ मार्च रोजी हा दिवस संपूर्ण जगभर महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो.
महिला ही कुटुंबाची, समाजाची आणि देशाच्या प्रगतीची आधारस्तंभ आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिका निभावत महिला समाजात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रांत मोठे यश मिळवले आहे.
आपल्या भारत देशातही अनेक महान महिलांनी समाजासाठी मोठे कार्य केले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नातून प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्य उभे राहिले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. आदर्श शासक म्हणून अहिल्याबाई होळकर यांनी कार्य केले. तसेच कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल केले.
आजच्या काळात महिला स्वावलंबी होत आहेत. महिला बचतगट, शिक्षण, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांमध्ये त्या पुढे जात आहेत. म्हणूनच आपण सर्वांनी महिलांचा आदर करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या प्रगतीला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे.
“स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही प्रेरणा आहे आणि स्त्रीशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे.”
असे प्रतिपादन केले.
मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिला बचतगटांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीत, नृत्य आणि भाषणांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमांमध्ये फुग्यांचा खेळ, संगीत खुर्ची आणि महिलांचा आवडते हळदी कुंकू, आणि उखाणे घेण्यात आले. स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले तर गावातील महिला बचत गटांना “नारी सन्मान प्रमाणपत्र” देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
गावातील प्रत्येक मूल गावातील शाळेतच जाईल हा निश्चय महिलांनी केला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक कार्यात पुढे यावे असे आवाहन डॉ . रचना शेळके यांनी केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आदर्श शाळा बनवावी असे मत मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती कोंडाबाई निकम, प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अजहर शेख, डॉक्टर रचना शेळके, कांता जाधव आरोग्यसेविका, सौ अरुणा विष्णू आडे , सौ रेखा काळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री आशिष फुलझळके यांनी केले. आभार श्री शहादेव काळे यांनी सर्व महिलांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास निकम उपाध्यक्ष गोकुळ इंगळे, आणि इतर सदस्य, तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, अंगणवाडी ताई, मदतनीस, आशा सेविका, आणि महिला भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Back to top button
