महाराष्ट्र
दुर्दैवी! पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत तरुण वास्तुविशारदाचा मृत्यू…
भारतीय संघर्ष Live...

” भारतीय संघर्ष न्यूज “
पुणे :(प्रतिनिधी ): शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता नगर परिषद कार्यालयाजवळील वाडा कॉलनी परिसरात घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चंद्रकांत जयसिंग भोसले (वय २६, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. तो उच्चशिक्षित वास्तुविशारद होता. कामानिमित्त तो दुचाकी (क्र. MH 12 XJ 1555) घेऊन शिरूर येथे आला होता.
येथील काम उरकून सायंकाळी घरी न्हावरे येथे परत जात असताना, नगर परिषद कार्यालयामागील मतिमंद मुलींच्या शाळेजवळील रस्त्याने मुख्य रस्त्यावर येत असताना पुण्याहून शिरूरकडे जाणाऱ्या पुणे–कन्नड एसटी बसने (क्र. MH 14 MH 8935) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत तो रस्त्यावर फरफटत गेल्याने डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत बस चालकाने स्थानिकांच्या मदतीने त्याला सरकारी दवाखान्यात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर बस रस्त्यातच उभी राहिल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक करांडे, वाहतूक शाखेतील राजू वाघमोडे व शेखर झाडबुके यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
मृत्यू झालेला चंद्रकांत भोसले हा उच्चशिक्षित व कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. गतवर्षीच त्यांच्या आईचे आजाराने निधन झाले असून, तो आपल्या माजी सैनिक असलेल्या वडील जयसिंग भोसले यांच्यासोबत न्हावरे येथे राहत होता.


